हाच तो.. जग बंद करणारा... कोरोनाचा नवा स्ट्रेन, व्हेरीयंट,  म्युटट-२

Maharashtra

हाच तो.. जग बंद करणारा... कोरोनाचा नवा स्ट्रेन, व्हेरीयंटम्युटट-२

होय , मी त्याला अनुभवलेलढलो आणि त्याला अनेकांसारखे हरवले कारण तुमची मला साथ होती....

किरण वाघ

जिला माहिती अधिकारी बीड

 

कोरोना आजारा विरोधात बीड सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचारातून एका सामान्य व्यक्तीचा यशस्वी लढा... या कोरोनातून बरे होण्याच्या प्रक्रियेत शासन यंत्रणेचा महामारी विरोधातला संघर्ष, कोरोनाने जागतिक पातळीवर मानव जातीच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण केलेले दिसले आणि माझा व्यक्तिगत बरे होण्यासाठीचा लढा, असे तीन भाग स्पष्टपणे दिसून आले.

 

तो एक निमोनिया आहे, साधा नेहमी होणारा सर्दी पडसं खोकल्याचा आजार आहे अशा चर्चा  आपण सहजच करतो पण हे अर्धसत्य आहे. कारण तो खतरनाक आहे.... कोरोना विषाणू आहे किंवा नाही? या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीचे मी या लेखाद्वारे तपशीलवार अनुभवसिद्ध विश्लेषण केले आहे. या कोरोनाने दाखवून दिलेले अस्तित्व आणि त्याची प्रचंड मोठी विध्वंसक क्षमता मला जाणवली. वर्षानुवर्ष  कामाचा भाग म्हणून  प्रचंड  ओघाने येणार्या  शासकीय माहितीचे वृत्तांकन आणि  माध्यमांना  थोडक्यात पुरवण्याची पद्धत माहित असल्याने सोप्यात सोप्या भाषेत हा वस्तुनिष्ठ अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याचा उपयोग पत्रकार मित्रांना कोरोनाचे वृत्तांकन करताना सत्य अर्धसत्य ओळखण्यासाठी होईल. सामान्य नागरिकास देखील कोरोनाच्या संभ्रम करणार्या समाज माध्यमासह, विविधांगी  ऐकीव अर्धसत्य माहिती पासून बचावासाठी उपयोग होईल. ही सद्भावना.

 

(कोरोना  बाधित झाल्या नंतर उपचार घेऊन शासकीय जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याानंतर,,,, कोरोना आजाराच्या सत्यपरिस्थितीचा या आजारातून बाहेर पडण्यासाठी इतरांना उपयोग  होईल या सद्भावनेने अगदी जसे घडले तसा या घटनाक्रमाला व मनातल्या विचारांना शब्दबद्ध केले आहे.  जसे सुचले तसे या माझ्या कोरोनातून बरे होण्याच्या वाटचालीतील स्वानुभावावर आधारित निरीक्षण व एक अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी कोरोना बाधित  होऊ नये यासाठी सावध करतानाच  कोरोना  झाल्यास कसं बाहेर पडावे यासाठी अनुभवाची सत्य शिदोरी आहे.--श्री. किरण वाघ, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, बीड )

 

 शाळेत शिकलेल्या कविततेच्या ओळी तीन-चार दशकांनंतर देखील आज या कोरोनाच्या वातावरणात लागू पडल्या आहेत. त्या यावेळी प्रकर्षाने आठवल्या आहेत... "आईच्या पदराआड बाळ राहिला नाही सुरक्षित निवारा ! द्रौणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल रे वारा...!!!"

 

हा संसर्गाचा वारा महामारी आल्यानंतर दीड वर्षाने शेवटी मला बाधलाच.माझ्या सरकारी कामाचा भाग म्हणून दररोजच्या सूरु असलेल्या  कामात कोरोनाच्या माहिती आणि माध्यमांशी संबंधित कामे करताना अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे कामासाठी जाणेप्रतिबंधात्मक आदेशांबाबत आमच्या कार्यालयाशी संबंधित बातम्‍या व कामासाठी इतर कार्यालयात जाणे सुरू होते....

या दररोजच सुरू असलेल्या बाबींना अचानक ब्रेक लागला...

 

१० एप्रिल २०२१ या तारखेला त्रास झाल्यानंतर काही जास्त नसेल उगाच धावपळीमुळे त्रास झाला असेल असा विचार केला.  पण सतत ताप वाढू लागला डॉक्टरांनी टेस्ट करून घेण्याचे सांगितल्याने टेस्ट केली 14 तारखेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

 

कोरोना म्यूटट २ चा माझ्यावर अॅटॅक

अॅटॅकच म्हणावा लागेल...हा कोरोनाचा नवीन व्हेरीयंट घातक आहे असे माझ्या शरीरात या विषाणूंचा प्रवेश झाल्यानंतर अनुभवावर समजू शकलो. मजबूत शरीरयष्टी असताना हा विषाणू गंभीर तापाचे लक्षण दाखवून माझ्यातल्या चिवट मानवी प्रतिकार शक्तीला आतून उध्वस्त करत असल्याचे मला स्पष्ट जाणवलं.माझ्यासाठी कोरोना विषाणूशी हा थेट आमना-सामना झाला होता.  त्याने  माझ्या शरीरात प्रवेश केला  आणि  तापाच्या रूपाने  गंभीर हल्ला केला. माझे उपचारासाठीचे बाकी सोपस्कार होईपर्यंत सतत ८ दिवस  तो  वाढत होता आणि माझी प्रतिकारशक्ती हारत होती.  हा सौम्य नव्हता हे नक्की लक्षात आले. व्हाट्सअप वरचे कोरोनाच्या बाबतचे ज्ञान, टीव्ही वृत्तपत्रातील माहिती, फुकटचे सल्ले .. एक सामान्य माणूस म्हणून  कोणत्याही आजार अडचणीवर विचार करून  निर्णय घेताना घडणारी प्रक्रिया या कोरोनाच्या सत्य स्थिती पुढे निष्प्रभ झाली.

 

कारण तसे इतरांकडून ऐकलेला व काही होत नसते. ( असा वरवर पाहून, ऐकून, विचार न करता उगाचच मनाला मी गोड गैरसमज करुन घेतला होता. तो एका झटक्यात कोसळला) सुरू झाला एक संघर्ष कोरोना विषाणूचा आणि माझ्या मानवी शरीरातल्या प्रतिकारशक्तीचा....

कोरोना महामारीच्या जागतिक *महायुद्धात माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचे शरीर हे 'बॅटल- ग्राउंड' युद्धभूमी झाले, कोरोना विषाणू आणि कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामध्ये त्याला कडाडून विरोध करत त्यांनी मला त्याचा तावडीतून सोडवून बाहेर आणलं जे मी अनुभवलं. असेच लाखो रुग्ण बरे होत आहेत.

 

चांगली प्रॅक्टीस आणि नाव असलेल्या एम.डी. फिजीशियन डॉक्टरांनी दिलेली तापावरची उत्तम औषधे घेतली होती तरी पण भिनभिनत अंगात घुसलेला ताप ३ र्या दिवशी पण हटला नव्हता.मी ताप अंगावर काढला नाही, तापावर डॉक्टरांची तात्काळ ट्रिटमेंट घेतली. त्या ताप येण्याच्या क्षणापूर्वी शरीर व तब्येत एकदम चूस्त व मस्त होती.  मग हे काय? असा ताप यापूर्वी जन्मात कधीही जाणवला नव्हता.  इथेच गोड गैरसमजाचा पहिला बुरुज ढासळला. म्हणजे हाच तो कोरोना विषाणू डोळ्यांना न दिसणारा... त्याला  covid-19,  नोव्हल कोरोना व्हायरस , कोरोनाचा नवा व्हेरीयंट, नवा स्ट्रन अशी  वेगवेगळ्या नावाने ओळख  दिली गेली... ख्रिसमसच्या वेळी युके मध्ये म्यूटेशन झालेला  हा नवा प्रकार समोर आला. जर्मनी फ्रान्स इंग्लंड सह  युरोपातल्या अनेक देश  दुसऱ्यांदा  लाटेचा सामना करण्यासाठी लाॅकडाऊन झाले. पण ज्याने सगळं सगळं जग जाम केलंय....जगातल्या अमेरिका इंग्लंड सारख्या रथी महारथी देशांना कुलूपबंद करुन टाकले आहे हा तोच आहे हे पुढे माझ्या लक्षात आले आणि त्याच्या तडाख्यात मी एक सामान्य व्यक्ती सापडलो होतो.

 

झोपच उडाली....  (तसं मागच्या वर्षीच या कोरोना विषाणूचे आगमन झाले . आपल्याला आतापर्यंत काही झालं नाहीकाही होत नाही या विचाराला त्याने हा जोरदार झटकाच दिला....त्याने बहुदा दुसऱ्या लाटेत..त्याचे क्राऊन( काटे )वाढलेत असे ऐकत होतो.  ताकद वाढलेला हा विषाणू भयानक आहेहे मनात कुठेतरी जाणवले.  त्यामुळे नियम पाळून सगळी काळजी घेतली असूनही त्याने माझ्यावर कोणत्या तरी एका क्षणी यशस्वी अॅटॅक केला व मला अडकवले)

तरीही  आपण घरी राहूनच बरे होऊ शकतो असं वारंवार कानावर आढळलेल्या माहितीमुळे एक उगाचच वाटत होते... आणि तसे पण कोवीड केअर सेंटरच्या भिंतीवर लावलेल्या सूचनाकागदावर 'होम आयसोलेशन' साठी नियम लावला होता तो वाचल्यावर १)एमडी फिजिशियन चे प्रमाणपत्र,२) गृह विलगीकरणाची सोय दाखवणारा व्हिडिओ ३) शरीराचे तापमान मोजणारे आणि पल्स आॉक्सीमीटर सारखी सुविधा असेल तर होम आयसोलेशन होता येते.आता मला झालेला कोरोना कोणत्या प्रकारचा आहे हे लक्षात येणं गरजेचं होतं. सौम्य आहे का? फोनवरून सल्ले देणाऱ्या अनेकांनी माझ्या बाह्य क्षमता पाहून असेल बहुदा काही नाही तू घरी बरा होऊ शकतो असा सल्ला दिला. पण ताप तर गंभीर जाणवत होता. सौम्य म्हणजे काय मला वाटतंनुसता वासच शरीरापर्यंत पोहोचला की मळमळते तसा वातावरणातल्या कोरोनाचा नुसता बाह्य संपर्क झाला म्हणजे संसर्ग झाला, असं होत नसावे आणि तो सौम्य ठरत असावा. पण गंभीर लक्षणे असल्यास मात्र सरकारने निर्माण केलेली प्रचंड मोठी वैद्यकीय यंत्रणा, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर इंजेक्शनच त्याला थोपवण्यासाठी काम करु शकतात, हे नक्की.

 

पण माझा ताप मात्र उतरत नसल्याने मानसिक टेंशन प्रचंड वाढले होते.

कोरोना विषाणूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने वाढणारा गंभीर ताप रोखणे गरजेचे होते. एक- एक  दिवस वाढत होता. या प्रक्रियेतच आठ दिवसाचा पहिला टप्पा कोरोना विषाणू ने जिंकला होता. सिटीस्कॅन रिपोर्ट मधून माझ्या फुफ्फुसातील त्याचं अस्तित्व  स्पष्ट दिसून आलं होतं आणि  तापाच्या रूपाने रक्तामध्ये  त्याने थैमान घालायला सुरुवात केली होती. मी मागे पडलो होतो... हारत होतो.

 

नुकतेच पुण्यातले आमच्या विभागाचे अधिकारी स्व.राजेंद्र सरग, बीड येथील नियमित भेटणारे पत्रकार स्व. संतराम माने, जवळचे नात्यातले तळेगावचे दादा या व्यक्ती कोरोना झाला आणि आपल्यातून निघून गेल्या. हे मी बाधित झाल्याच्या पुढे-मागे झाले आहे हे दिसून येत होते.

पण विचार प्रक्रिया शाबूत असल्याने मिळालेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे लगेचच होम आयसोलेशन सारखा निर्णय न घेता आणि मिळेल त्या उपचारामागे न लागता. सिटीस्कॅन मधील स्कोर काय आहे? हे कळणे महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली. त्यासाठी सिटीस्कॅन व तपासण्या केल्या. ताप उतरत नसल्याने ऍडमिट होण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले.

 

....आणि माझा कोरोना विरुद्ध उपचारांचा लढा सुरू झाला.

आपण आता गंभीर कोरोना बाधित झालो आहे. हे मनात ठसले. त्यातून जसे वयाची शंभरी पार केलेले आज्जी - आजोबा बरे होत आहेत.  तसे कमी वयाचेव्याधीं असलेले लहान -तरुण मुलस्त्री पुरुष जीव गमावून बसत आहेतहे दिसत होते.  गाफिल राहणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देणे हेच होते. बाधित झाल्यापासून आठ दिवस तो मात्र सतत माझ्यावर खंबीरपणे अॅटॅक करत होता. त्याने माझ्या शरीरात प्रवेश केला आणि त्याची मानवाला ध्वस्त करण्याची क्षमता मला जाणवून आली.

 

सिव्हिल हॉस्पिटलच्या फिवर क्लिनीकपासून उपचाराला सुरुवात झाली. त्रास झाल्यापासून ८ दिवसाच्या नंतर ताप उतरला. आधुनिक वैद्यकशास्त्र, इंजेक्शन्ससलाईन , औषधे यांचा  सतत  मारा करून त्याला कोरोना योद्धा डॉक्टरांनी थोपवलं होतं, संपवलं होतं .योग्य माहितीसह सर्व उपलब्ध असून देखील सुरुवात झाल्यानंतर या गंभीर तापातून बाहेर पडायला ८ दिवस गेले. कोरोना आयसोलेशन वॉर्ड ( covid-19 विलगीकरण कक्ष ) मध्ये ट्रिटमेंट सूरु झाली.

 

 शासकीय  वैद्यकीय उपचारांचे पाठबळ, औषधांपासून, ऑक्सिजनरेमडिसेवीरइंजेक्शन आणि मुख्य म्हणजे तातडीने उपलब्ध झालेला कोरोना ट्रिटमेंट साठी बेड या सर्व उपलब्धताच्या जोरावर पूर्ण विश्वासाने मी उपचारांना साथ दिली. 

 

जवळपास साडे चार दिवस गरजेनुसार ऑक्सीजन सपोर्ट देण्यात आला होता. या दरम्यान कानावर येणाऱ्या वाचायला मिळणाऱ्या बातम्या , दिसणाऱ्या घटना यांचे  मनावर नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही परिणाम होत होते. अगदी राष्ट्रीय रिकव्हरी रेट ९३-९४ टक्के आहे.  उरलेल्यांचे कायया अशा विचारांनी मन कधी सैरभैर ..तरी आपले काय होणार म्हणून कधी संवेदनशील होत होते. ( यामुळेच म्हणत असावे अज्ञानात सुख असतेपण मला तर सगळेच अपडेट हाताच्या बोटांवर मिळत होते) या मनाच्या खेळावर उपाय एकच ऑफ लाइन होणे आणि उत्तम उपचार होतील याकडे लक्ष देणे.

ताप उतरला आणि ऑक्सिजन सह ट्रिटमेंट नंतर मात्र तब्येतीत गतीने सुधारणा झाली.

 

...आणि  तब्येत  स्टेबल आहे  असा  रिमार्क असलेले डिस्चार्ज कार्ड हातात मिळाले., होम आयसोलेशनमध्ये कोणती काळजी घ्यायची याच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचना शांततेत समजून घेऊन मोठ्या आनंदाने घरी परत आलो.

 

कोरोना साथीच्या धोक्याची दूसरी बाजू(जागतिक महामारी बरोबर लोकशाही शासन यंत्रणेचा संघर्ष)

 

या कालावधीत,,,,   नातेवाईक मित्र वरिष्ठ हितचिंतक मेसेज द्वारे संपर्कात राहून प्रोत्साहित करीत होते.

 

भीती वाटत नव्हती पण तापाचे प्रमाण, रेमडेसीवीर उपलब्ध नसणेऑक्सीजनचा झालेला तुटवडा या देखील बातम्या कानावर यायच्या. सिविल  हॉस्पिटल मध्येच ट्रिटमेंट सुरु असल्याने अडचणी जाणवून येत होत्या. पण नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून बरे होण्याच्या दृष्टीनेे विचार करत राहीलो.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्स वॉर्डबॉय एकंदर सर्वच स्टाफ हे सर्वजण प्रचंड मेहनत घेताना दिसत होते. या संसर्गाच्या साथी मध्ये नागरिक -रुग्णांच्या अपेक्षा, महामारीसह सर्व परिस्थितीमुळे अगतिक होऊन यंत्रणेवर निघणारा राग सहन करत काम करत होते.यातून उपचार करणाऱ्या यंत्रणेच्या हातात असलेल्या बाबी, कमतरता व मर्यादांवर मात करून रुग्णांना बरे करण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड खूपच मोलाची वाटत होती. या सगळ्यांना स्वतःला संसर्गाचा धोका असताना कोरोना रुग्णांमध्ये राहून सेवा करत राहायचे काम खूपच मनाला भिडत होते.

 

उपाय योजनातील वाढते सातत्य, हेच लढ्यातील यश

एकंदरच लोकशाही यंत्रणेचा कोरोना महामारी च्या साथी बरोबर चा लढा उपलब्ध साधन सामुग्री मनुष्यबळासह चाललेला प्रचंड संघर्ष माझा डोळ्यासमोरून सरकत होता. या जागतिक महामारीने बाधित झाल्याने थेट संबंधित झालो होतो. पण या लढ्यात शेवटचा आरोग्य कर्मचारी असेल किंवा वैद्यकिय -प्रशासकीय पातळीवरील अधिकारी, नेतृत्व करणारे मा.पालकमंत्री,मा. मंत्री, मा.मुख्यमंत्री अथवा आपल्या राज्य देशाचे नेतृत्व... हे आपल्या मोठ्या कोट्यवधी लोकसंख्येला, लाखोंच्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णांना महामारीच्या साथी पासून वाचविण्यासाठी प्रचंड धडपडत आहेत हे जाणवले.आपल्या जिल्ह्यात आपले पालकमंत्री धनंजय मुंडे या परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक तेथे सूचना करत आहेतलोकप्रतिनिधी जागरूक असून लसीकरण, तपासण्या यासाठी आपापल्या भागात सुविधा देतायत, मदत करतायत.  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कोरोनायोद्धे दीड वर्षापासून या कोरोना युद्धात  या महामारी विरोधात मैदानात खंबीरपणे उभे ठाकून खांद्याला खांदा लावून लढत आहेत. जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने दररोज बाधित होत असले तरी हजारोंच्या संख्येने रुग्ण बरे होत आहे, राज्य व देश पातळीवर ही बरे होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या लाखोंच्या घरात आहे.

 

 या वाढत्या रुग्णसंख्येला ऑक्सिजन , रेमेडीसेवीर इंजेक्शन्स, औषधे , बेडसाधन सामग्री यांची उपलब्धता करुन देताना प्रचंड ताण या यंत्रणेवर येत आहे ...हे प्रत्यक्ष दिसतं होत,, जाणवत होतं. यात काही अनिष्ट बाबींना रोखून लोकांना वाचवणं बरे करणे याची या सगळ्याच्या मुळाशी  असणारी धडपड ही या लढ्यातील खूपच सकारात्मक बाजू आहे हे वाटलं. ..

 

यामुळे मी खाजगी हॉस्पीटल पेक्षा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचा निर्णय घेतला.. हे मला योग्य वाटले.

माझ्या उपचारात औषधे, इंजेक्शन्स यांची कोणतीही कमी नव्हती ...सतत वैद्यकीय स्टाफचे लक्ष असायचे.कोरोना बाधित रुग्णांची सतर्कता पाहण्याची त्यांची पद्धत आश्चर्य वाटायची,, रात्री- पहाटे -दिवसा अचानक येऊन जोरात तुमचे नाव काय? विचारले जायचे..आणि रुग्णांची नकारात्मक तंद्री असेल तर ती  भंग व्हायची.

 

कठीण प्रसंगात माणुसकीचे दर्शन

या कठीण प्रसंगात व्यक्तीगत पातळीवर मित्र, शेजारी, वरिष्ठांसह संपर्कात आलेल्या सगळ्यांकडूनच चांगुलपणा आणि माणुसकीचे दर्शन झाले,,, मला असं वाटत कलियुगात संपत चाललेली माणुसकी या कोरोनाना पुन्हा जिवंत केली आहे. माणसाला स्वार्थी चौकटीबाहेर आणले आहे.

या सगळ्यात काही जणांनी केलेली मदत प्रकर्षाने पुढे आली,, नोकरी करायच्या परक्या भागात कोणते रूणाणूबंध माहिती नाही,,  बहुदा यालाच माणुसकी म्हणतात.. कुणालाही न सांगताही शांततेत ट्रीटमेंट घेऊन बरे व्हायचे मी ठरवलेले असून देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती काही मित्रांपर्यंत पोहोचली. तर गरज म्हणून काही जणांना  सांगितले. पण मग इतर कुणाला देखील सांगायचे नाही असे ठरवले. वरिष्ठांना माहिती दिली त्यामुळे बहुता ऍडमिट होताना त्यांना माहीत असल्यामुळे असावे. मला ट्रीटमेंटमधील अडचणीच्या प्रसंगामध्ये त्यांचा उपयोग झाला.

 

अडचणीत स्वतःहून पुढे येत काहींनी पहिल्या दिवसापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत सतत काही अडचणी आहे का भोजन वेळेवर मिळतय का इथपासून प्रत्यक्षात काढा- नाश्ता -आहार व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घेतली, औषधांबरोबर योग्य व वेळेवर मिळालेला आहार महत्त्वाचा ठरला. यामध्ये अनोळखी व्यक्तींचे देखील मोलाचे सहकार्य झाले. यात कोणा एकाचे नाव घेऊन इतरांच्या सत्प्रवृत्तीला दुर्लक्षित करण्याचा विषयच नाही कारण माझ्या मदतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उभा राहिलेला प्रत्येक जण माझ्या कोरोना विरुद्धचा लढ्यातील साथीदार होता त्याशिवाय मी हा छोटासा वैयक्तिक लढा लढू शकलो नसतो.

या सगळ्यांमध्ये सीईओ साहेब, मुळीे साहेब , डॉ.आंधळकर साहेब , डॉ. रायमुले, रिजवानभाई , गणीभाई, बिपिनजी देशपांडेत्यांचे कुटुंबीय , नीलिमा ताई, वैजनाथ जोशी, ऋतिक ढोके, सांगळेजी, भंडारी साहेब, गणेश पवार व माझ्या हॉस्पिटल मधील डिस्चार्ज कार्डवर सही करणाऱ्या डॉ.कोकिळ ऋतुजा, मी  कोरोनाने आजारी पडलो आहे हे लक्षात आल्यानंतर बरे होण्यासाठी मनामध्ये अखंड यज्ञ मांडलेल्या आई , पत्नी , बहिण जिजाजी , अचानक आलेल्या या प्रसंगात स्वत:ला सांभाळून आजी व आई बरोबर समजूतदारपणे घर सांभाळणारी मुलगी व मुलगा, फोन मेसेज द्वारे मला सदिच्छा देणारे भाऊ, नातेवाईक, मित्र, सहकारी, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे हे सांगितल्यावर देखील रिक्षामध्ये घेऊन सिविल पर्यंत पोहोचविणारे अज्ञात रिक्षावाले, वाॅर्ड मध्ये माझ्या बेडच्या जवळ असल्याने अप्रत्यक्ष दिलासा देणारे मोहसिन, तौफिकपी पी ई किट-मास्क घालून येणारे डॉक्टरनर्स, स्टाफ ज्यांचे चेहरे देखील ओळखू शकलो नाही, अशा अगदी प्रत्येकाच्या सहकार्यातून मी बरा झालो.

या संसर्ग साथीचा दूसरा धोका   आई व पत्नीस देखील त्रास जाणवू लागल्याने व मी स्वतः ऍडमिट असल्याने काय चाललंय हे मला कळलेनासे झाले ..पण शेजारी आणि बाजूच्या स्नेहांकित व्यक्तींनी त्यांना दवाखान्यात नेणे,, औषधे उपलब्ध करून देणे या गोष्टी केल्याने मी घरी येईपर्यंत त्या अडचणीत मोठी वाढ झाली नाही. घरी काही वस्तू लागत आहेत का हे पाहण्यासाठी घरापर्यंत सपोर्ट मिळाला. या सर्व बाबी कठीण अडचणीत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या होत्या.

 

पत्नीची  कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. पण खचून जाणे काय असते त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात आले. आईची तब्येत अजून पुरेशी सुधारली नाही. आणि आणि केंद्र सरकार मी नुकताच घरात देखील मास्क लावायची गरज आहे आहे असा दिलेला इशारा टीव्हीवर बघण्यात आला. या स्थितीत यातून प्रत्यक्ष बाधित होण्यापासून त्यांना वाचवणे, पूर्ण बरे करणे गरजेचे आहे हे मला दिसून आले.

या आजाराने केलेल्या शरीरातील पडझडीच्या खुणा आजही त्रास देतात, दोन्ही हातांमध्ये अनेक दिवस घुसलेल्या सलाईनच्या सुया, इंजेक्शनच्या सुया वेदना देतात, शरीरातील प्रतिकार शक्ती ची मोठी हानी झाल्याने बहुदा ती भरून काढण्यासाठी अचानक लागणाऱ्या भुकेने जीव कासावीस होतोय, श्वास आत ओोढायला थोडा त्रास होतोय, अर्थात रुग्णालयातून घरी येऊन दोन-तीनच दिवस झालेत शारिरीक क्षमता हळुहळू सुधारत आहे.  डॉक्टरांनी होम आयसोलेशन मध्ये काळजी घेऊन बरे होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर  घरी परतल्याने आता होम आयसोलेशन मध्ये असताना माझ्याबरोबर त्या दोघींना देखील पूर्ण बरे करणे आणि कुटुंबातील वातावरण पूर्ण नॉर्मल करणे यासाठी मला आता अडचण वाटत नाही. ही कोरोना पासून पूर्ण सूटका ठरणार आहे. आणि माझं सामान्य आयुष्य चालू होणार आहे.

कामाची घडी ठप्प

 

या सर्व प्रयत्नांमध्ये कामाचे काय चाललंय याची बिलकुल माहिती नव्हती, शारीरिक व मानसिक स्थिती नव्हती. पण काळजी करू नका, उपचाराकडे लक्ष द्या.. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे काळजी घ्या व बरे व्हा... एवढा सल्ला  सतत मिळत असल्याने पूर्ण लक्ष तिकडे वेधले गेले होते.

यामध्ये शासकीय वैद्यकीय यंत्रणातील व्यक्तींंची धडपड , वैद्यकीय उपचाराची मिळालेलीे योग्य माहिती , मानसिक आधार देणाऱ्या अनेक व्यक्ती आणि प्रचंड तापानंतर देखील एनर्जी संपली वाटत असताना देखील पूर्ण बरा होणार हा विश्वास खूपच आनंद देणारा होता. यामध्ये आई वडिलांनी लहानपणापासून तापावर आजारांमध्ये कोणती बेसिक काळजी घेत राहिली तर बरं वाटतं हे बिंबवले असल्याने प्रत्यक्षात पॉझिटिव्ह येऊनही ट्रीटमेंट घेऊन, साडे चार दिवस आॅक्सिजन सपोर्टच्या  नंतर  इंजेक्शनचा प्रोटोकॉल संपल्यावर लगेच तब्येत स्टेबल झाल्याने डिस्चार्ज  लवकर मिळण्यास मदत झाली,

मेडिकल ट्रिटमेंट मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधील ड्युटी वरील अनेक डॉक्टरचा सहभाग असल्याने प्रत्यक्षात कोणा एकाचे नाव घेणे इतरांबाबत प्रतारणा ठरेल.  पण डॉक्टर, नर्स, वैद्यकीय व सपोर्ट स्टाफ या सर्वांचे  अमूल्य उपकार आहेत.  त्या प्रत्येकाचे आभार मानने मात्र या ठिकाणी अत्यावश्यक आहे.

 होम आयसोलेशन मध्ये पूर्ण काळजी घे , बरा होऊन जाईल, असा डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आणि परत घरी आल्याने मला खूप आनंद झाला.

 

... तरीही काही निष्काळजी देशबांधव

हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊन उपचार घेत असताना आजूबाजूच्या रुग्णांकडे पाहून मन विचारी होत होतं...

सरकार कोरोना ची लाट थोपविण्यासाठी प्रचंड धडपडत आहेलाॅकडाऊन होत आहेत , उद्योग व्यवसाय, शाळामहाविद्यालय बंद आहेत, अधिकृत वृत्तपत्र व माध्यम टीव्ही चॅनल्स दिवसाचे 24 तास कानीकपाळी ओरडून सांगत आहे, बाबांनो काळजी घ्या .

 

तरीपणवय 57 -58  वर्ष असलेले माझा बाजूच्या बेड वरचे कोरोना बाधित रुग्ण...  आयसोलेशन वाॅर्ड मध्ये सुद्धा त्यांना दररोज भेटायला येणारे पत्नी मुलं जावई मुली मित्र रोजच सात ते आठ जण पाहून मला धक्काच बसला तो माणूस गंभीर आजारी झाल्याने ऑक्सीजन मिळवण्यासाठी धडपडत आहे आणि हे दिसत असून देखील भेटायला येणार्यांचा हा कोणता उत्साह त्यातला एक जरी संसर्गाने बाधित झाला, तरी त्याच्या कुटुंबापर्यंत किती मोठा धोका घेऊन जाईल.. वार्डमधील डॉक्टर नर्स सांगत असून देखील कसं यांना कळत नव्हतं.. यांचा उद्देश काय?? आजाराची साथ वाढवण्यासाठी हे हातभार लावत आहेत का?

कोरोना नावाचं बायोलॉजिकल वेपन?(जागतिक लढ्याची काळी बाजू)

या कोरोना विषाणूला निसर्गानं जन्माला घातले की शत्रु राष्ट्रांना संपवण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची निर्मिती केली गेली हे सिद्ध करण्यासाठी डब्ल्यूएचओ आजही काम करत आहे.या विषाणूची मारक क्षमता मात्र अष्टपैलू आहे, महाविद्यालयीन एनसीसी मध्ये असताना आमच्या मेजर कमांडर ने रायफल थ्री नोट थ्री (३०३)ची कारगर रेंज (मारक क्षमता) 1000 गज असून त्या टप्प्यात येणारा गोळी लागून मरू शकतो हे सांगितले होते. या विषाणूची कारगर रेंज शरीरात घुसल्यावर वाढते त्याची संख्या वाढत जाते मारक क्षमता वाढते आणि तो मानवास मारतो.  जागतिक सत्तास्पर्धेच्या *महायुद्धाचे हे वेगळं रूप आहे असे मला वाटते. पूर्वी युद्ध देशाच्या सीमांवर व्हायचे सैन्यदल शत्रूला नामोहरम करण्यासाठी हल्ले चढवायचे, सीमाभागातील गाव शहर उध्वस्त व्हायची. सत्ता गाजवण्यासाठी शत्रु राष्ट्रावर हल्ले केले जायचे.  पण या नव्या बायोलॉजिकल वेपन शस्त्राने युद्धाच्या पद्धतीत बदल केला आहे. धरणं , इमारती, रस्ते, गावशहरे नष्ट करण्याची गरज नाही. थेट नागरिकांच्या शरीरात प्रवेश करुन त्यांना मारण्याची क्षमता धारदार आणि कारगर आहे ,असा हा कोरोना आहे.जागतिक सत्ता लालसेचे हे आधुनिक हत्यार तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या घरात व शरीरात शिरते आहे. ( **अमेरिका व जागतिक आरोग्य संघटनेने चीन या राष्ट्रावर केलेले आरोप आणि त्याची शहानिशा करण्यासाठी तेथे दिलेल्या भेटी याचा संदर्भ या परीच्छेदास आहे)

 

 पण जिथे हत्यारे आली तिथे त्याच्यापासून बचावाचे उपाय आले आणि ती ढाल वैद्यक शास्त्राने दिली. दीड वर्षापासून त्याने जगाला वेठीला धरले आहे. अजूनही त्याचा पूर्ण खातमा झाल्याचं दिसून येत नाहीये. मानवजातीला उद्धवस्त करण्याचे चायलेंज दिल्यासारखा तो जगात थैमान घालतो आहे. सध्यातरी त्याच्या रेंज बाहेर राहणं आणि चुकून शरीरात घुसला तर अत्याधुनिक वैद्यक शास्त्राच्या मदतीने बरे होणे हाच मार्ग आहे.

 

महामारीच्या लढ्याच्या सकारात्मक शेवटाकडे जात आहोत

या जागतिक महामारीला हरवण्यासाठी आता जग सज्ज झालेले आहे. जागतिक महामारीची महासागरा एवढी समस्या असल्याने तिला  रोखण्यासाठी जागतिक पातळीवर मोठमोठे देश, मोठमोठ्या कंपन्या, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ वेगाने पुढे आले . दीड वर्षात वैद्यक संशोधनाच्या रूपाने या समस्येचे उत्तर शोधले गेले.  महासागरासारखा पैसा ओतला गेला आणि तयार झाले "कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सीन".

 

 सूक्ष्म विषाणूला सांगितले गेले, पृथ्वीतलावर मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. आज आणि येथून पुढे देखील रूप बदलून आलेल्या शत्रूला रोखण्यासाठी आमचे नवीन सैनिक , कोरोना योद्धेआमचे राष्ट्र सक्षम आहे.

 

आणि त्यातील नागरिक निर्धास्तपणे राहू शकतातकारण मानव जातीच्या कल्याणासाठी झटणारी प्रवृत्ती व माणुसकी येथे जिवंत आहे. इथला या लोकशाही राष्ट्रातील नागरिक  जागरूक आहे, जबाबदारीने वागतो आहे. महामारीच्या एकामागे एक येणार्‍या लाटा  थोपवतानाच लसीकरणाच्या माध्यमातून आपल्या भोवतीची तटबंदी मजबूत केली जात आहे, लोकशाही भारत देखील या सर्व प्रयत्नात कुठे देखील मागे नाही.  कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन असेल, लसीकरणाचा वेग असेल, हे सांभाळून आपण देखील या महामारीतून भविष्यात लवकर बाहेर पडण्यासाठी वेगात पाऊल टाकत आहोत. यामुळे covid-19 चा हा काळाकुट्ट अध्याय लवकरच इतिहासात जमा होईल. पण मानवाच्या जागतिक इतिहासात हे 'काळे पान' कायम आठवण देत राहील. अनेकांनी गमावलेले जीव , उद्ध्वस्त झालेले कुटुंब, देशोधडीला लागलेले सर्वसामान्य गरीब नागरिक,,, पण पुढे जाण्यासाठी हे सगळं विसरायला लागेल.

कालाय: तसमैये नम:!!

 

जीन जखम को वक्त भर चला हैतुम क्या उसको छेडे जा रहे हो!... तूम क्यूँ इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है तुमको छुपा रहे हो!!

आता जखम छेडणे थांबवणे गरजेचे आहे. खूपच झाले  माझे अनुभव सांगणं, तुम्ही देखील सहन केला हा वेदनेचा हुंकार बस्स,,,काय सांगु ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता थकवा वाढला आहे. या लेखापुरते थांबणे गरजेचे आहे.

पण,,  मित्रांनो कोरोना सारखे काही नसतं....हे जेव्हा तो भिडला तेव्हा खरं कळलं....

 

तो आहे त्यानं जग बंद केलं आहे ....हा काळजी घेणे गरजेचे आहे पण चुकून  गंभीर बाधा झालीच तर...

घाबरायचं बिलकुल  नसतंय... योग्य उपचार घेऊन पूर्ण बरे व्हायचे आणि हा कोरोना विरुद्धचा लढा जिंकायचा!!!

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

आणि म्हणायचं ,,,जिओ जिंदगी...!!!

 

सोबत:- कोरोना पॉझिटिव्ह चा रिपोर्ट, सिटीस्कॅन रिपोर्टमधला रिमार्क, हॉस्पिटलच्या डिस्चार्ज कार्ड वरचा रिमार्क, जिल्हा रुग्णालय बीडच्या भिंतीवर लावलेला covid-19 ट्रिटमेंट प्रोटोकॉल्स चा तक्ताआहार भोजन याच्या वेळापत्रकाचा तक्ता आणि इतर १-२ प्रतिकात्मक फोटो. माहितीसाठी.

लेख आवडल्यास कृपया आपली प्रतिक्रिया मेसेज व्हाट्सअप आणि  ईमेल द्वारे  पाठवावी मला नक्की आनंद होईल.

मो. क्र. ९८५०५४९७९७/

kiran.rwagh@gmail.com.

धन्यवाद.

(या प्रक्रियेतील अनेकांशी बोलणे गरजेचे आहे, पण एक्झरर्शन वाढतं आहे म्हणून सध्या बोलणं टाळून हा दिर्घ मेसेज टाकत आहे)